Madha News : माढा : आज बँकींग क्षेत्रात सातत्याने आमूलाग्र बदल होत असून, तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. नवनवीन माहिती व तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या गरजेनुसार ध्येयधोरणे बदलत आहेत. या सर्व बाबींची माहिती राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे नागरी बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणे आवश्यक आहे. या उद्देशाने नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने दर महिन्याला प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे बँकीग क्षेत्रातील बदलत्या माहितीची व अनुभवाची देवाणघेवाण होते, असे प्रतिपादन नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लुणावत यांनी केले.
सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा
सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. (Madha News) प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय संचालक दीपक मुनोत यांनी करून दिला. लुणावत म्हणाले की, एखाद्या बँकेला कामकाजाबाबत उल्लेखनीय यश मिळाले किंवा नेत्रदीपक प्रगतीमुळे पुरस्कार मिळाला तर पदाधिकारी व संचालकांचे भरपूर कौतुक होते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले पाहिजे. त्यामुळे त्यांची काम करण्याची ऊर्जा वाढते. कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले आणि ग्राहकांना सेवा दिली तर संस्थेची प्रगती होऊन चांगला नावलौकिक मिळतो.
या वेळी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक धनंजय वडापूरकर यांनी स्वयंशिस्त, सकारात्मक दृष्टिकोन व परिणाम आणि बँकेच्या प्रगतीतील सहभाग या विषयावर पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले. (Madha News) दुसऱ्या सत्रात निवृत्त व्यवस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी वेळेचे व्यवस्थापन, स्वयंप्रेरणा व दैनंदिन कामकाजावरील परिणाम या विषयावर कर्मचाऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
या वेळी संचालक राजगोपाल मणियार, सहव्यवस्थापक नंदकुमार दुड्डम यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Madha News) सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी ढवळे यांनी केले. आभार संचालक दिनकर देशमुख यांनी मानले.