राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : जीवनात कधी हताश, उदास, निराश न होता समोर चालत राहणे हा आयुष्याचा नियम आहे. जो या नियमांचे पालन करत आयुष्य जगतो, त्याला जीवनात हमखास यश गवसते. माझ्या संघर्षमय जीवनात मी याच नियमांचे पालन केले आणि यशाला गवसणी घातली… परिस्थिती नसतानाही यशाचे शिखर गाठून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करणारे पोलीस उपअधीक्षक किरण पोपळघट विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत होते.
मिरवडी ग्रामपंचायतीमार्फत “मी कसा घडलो” या चर्चासत्राचे आयोजन
निमित्त होते, मिरवडी ग्रामपंचायतीमार्फत शाळकरी मुलांसाठी आयोजित “मी कसा घडलो” या चर्चासत्राचे! आजची शाळकरी मुले, हीच उद्याच्या समृद्ध व संस्कारीत मिरवडी-मेमाणवाडीची संपत्ती आहेत. (Yavat News) शालेय विद्यार्थ्यांना बाह्यजगाची ओळख व्हावी, मोठ-मोठी स्वप्न पाहण्याची सवय लागावी आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श, संघर्षमय व्यक्तींच्या यशस्वी जीवनप्रवासाचा उलगडा व्हावा, या उद्देशाने या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
“स्वप्न ती नसतात, जी झोपल्यावर पडतात; स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत… या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या बहुमूल्य मार्गदर्शन तत्त्वाचे अनुकरण विद्यार्थ्यांनी करावे यासाठी ग्रामपंचायत मिरवडीच्या सभागृहात हिंगणगाव (ता. हवेली) येथील किरण देविदास पोपळघट यांची मुलाखत घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यशस्वी होत, किरण पोपळघट यांनी ६७वी रँक मिळवून पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. (Yavat News) स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करत. आई-वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचा विश्वास सार्थकी लावत. योग्य व काटेकोरपणे नियोजन करत. स्पर्धा परीक्षेला सामोरे जात पोपळघट यांनी पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. परिस्थिती नसताना त्यांनी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. त्यांच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेरणा घेत, अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे, हा या मुलाखतीच्या आयोजनामागील हेतू होता.
या वेळी अनेक विद्यार्थी व पालक यांनी किरण पोपळघट यांच्याशी सकारात्मक हितगुज केली. ग्रामीण भागातील मुलांसाठी उपलब्ध राहून त्यांच्या करिअरसाठी विशेष उपक्रम व मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. (Yavat News) या आवाहनास पोपळघट यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुलांच्या अनेक प्रश्नांचे निवारण केले.
या वेळी अनेक प्रमुख अतिथींचा सन्मान वृक्षभेट देऊन करण्यात आला. या वेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, मिरवडी ग्रामस्थ व हिंगणगाव परिसरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : कर्नाटकमधून आलेली २८ लाखांची ८४ टन साखर परस्पर लांबवली