लहू चव्हाण / पांचगणी : पाचगणी परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. भिलार अंजुमन परिसरात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला होता. वनविभाग व एनीमल रेस्क्यूच्या टीमने बिबट्याची सुरक्षित सुटका केली. सकाळी विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी विहिरीत डोकावून बघितले असता बिबट्या पडलेला दिसून आला.
ग्रामस्थांनी यासंदर्भात तात्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे ३५ फुट खोल विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला लाकडी शिडी व दोरीच्या सहाय्याने सुमारे दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर सुस्थितीत बाहेर काढून नजीकच्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी जागा खुली करून दिली. यावेळी वनाधिकारी यांनी सर्व ग्रामस्थांना वन्यप्राणी बिबट्या बाबत जनजागृती करून सावधान राहण्याचे आवाहन केले.
उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, वनक्षेत्रपाल महाबळेश्वर गणेश महांगडे यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही वनपरिमंडळ अधिकारी गुरेघर आर. व्ही. काकडे व वनरक्षक गुरेघर, वैभव अशोक शिंदे, वनसेवक, संजय भिलारे, कर्मचारी साहेबराव पार्टे, अनिकेत सपकाळ तसेच स्थानिक रेस्क्यू टीम, निसर्गमित्र यांनी पार पडली.