बीड: बीड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरेगाव घडली आहे. मावस भावानेच अल्पवयीन बहिणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना येथे घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील कोरेगाव परिसरातील वस्तीवर 13 वर्षीय मुलगी आई-वडिलांसोबत राहत होती. 20 मार्च ला अल्पवयीन मुलीचे आई-वडील नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले होते. तेंव्हा धाराशिव जिल्ह्यातील तिचा मावस भाऊ पाहूना म्हणून घरी आला. त्यानंतर घरात कोणीही नसताना त्याने मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुलीला चहा प्यायला जाऊ असे सांगितले. तेंव्हा बाहेर गेलेले दोघेही परतले नाही.
दरम्यान, आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांनी आपले नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली. मात्र मुलगी सापडली नाही. अखेर 22 मार्च रोजी मुलीच्या आईने केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. केज पोलिसांनी अज्ञात कारणासाठी मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मावस भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.