हडपसर, (पुणे) : फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट-6 च्या पथकाने वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीला अटक केली आहे.
उमेश शाहू पतंगे (वय 31, रा. गल्ली नंबर-2, सिद्धार्थ नगर, NIBM-कोंढवा रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे. त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची डुएट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 10) गुन्हे शाखा युनिट-6 चे पथक फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्याचा गंभीर तपास व आरोपींचा शोध घेत होते. छत्रपती संभाजी महाराज चौक, कृष्णानगर, हडपसर येथे पोलीस पथकातील पोलीस अंमलदार सचिन पवार यांना एक इसम डुएट गाडीवरून जाताना दिसला. गाडीच्या नंबर वरून त्याचा संशय आल्याने त्यास पथकाने थांबवले.
त्याला गाडीसह ताब्यात घेवून त्याच्याकडे त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव उमेश पतंगे असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अधिक माहिती घेतली असता गाडीचा इंजिन आणि चेसी नंबर काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गु.र.क्र. 172/2025, कलम 379 भादंवि अंतर्गत चोरीच्या गुन्ह्यात नोंद असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपीच्या ताब्यातून 20 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी त्याला काळेपडळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.