उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बकरी खरेदी करण्यासाठी आलेल्या तिघांना चौघांनी काठीने व हाताने बेदम मारहाण करून तब्बल पावणे सहा लाखांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. ५) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास उरूळी कांचन रेल्वे स्टेशनपासून पूर्व बाजूच्या पटरीने साधारण १ किलोमीटर अंतरावर ऊसाच्या शेताजवळ ही घटना घडली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रमेश (वय ३५), सुनील (वय ३५) व आणखी दोघे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) अशी मारहाण करून मुद्देमाल पळवणाऱ्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी अब्दुला लालबादशाह शेख (वय – ३०, रा. जेडीमेटला ऐरीया, जिल्हा रंगारेडडी, हैदराबाद) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शेख व त्यांचे दोन मित्र बकऱ्या खरेदी करण्यासाठी उरूळी कांचन रेल्वे स्टेशनपासून उजव्या बाजुच्या उसाच्या शेताजवळ गेलो असता अचानक दोन व्यक्ती समोर आल्या. या वेळी तिघांना रमेश, सुनिल व इतर २ अनोळखी व्यक्तींनी लाकडी काठीने, हाताने मारहाण करून त्यांच्याजवळील काळ्या रंगाची पैशांची बॅग हिसकावून ५ लाख रोख रक्कम, दोन मोबाईल व सोन्याची चेन, मित्रांचे दोन मोबाईल फोन असा ५, लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरी करून पळवला.
दरम्यान, या प्रकरणी शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रमेश, त्याचा नातेवाइक सुनिल व दोन अनोळखी इसमांविरूद्ध उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहेत.