दौंड,(पुणे) : शेतात गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेशी लगट करण्याच्या उद्देशाने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी मलठन (ता. दौंड) येथील एका तरुणावर दौंड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.16) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याप्रकरणी एका महिलेने दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार लखन विरकर (पूर्ण नाव माहित नाही) रा. मलठण, ता. दौंड, याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 78, 79 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत कलम 3(1)(w)(ii) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या दिराच्या शेतात सकाळी दहा वाजेच्या सुमारास गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी शेजारील शेतात मजुरीसाठी आलेल्या लखन विरकर याने महिला हि अनुसूचित जातीतील असल्याचे माहिती असतानाही अंगावरील कपडे काढून नग्न होत अश्लील हातवारे केले.

दरम्यान, या प्रकारामुळे महिलेला लज्जा वाटली आणि ती घाबरली. यामुळे तीने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक घोडके पुढील तपास करीत आहेत.







