बंगळुरु: पत्नी आणि तिच्या माहेरच्या सात जणांची हत्या केल्याच्या प्रकरणात तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी टॅक्सी चालक एस. इंदुशेखर (वय ५२) याने झोपेच्या गोळ्या मिसळलेला मोसंबीचा रस देऊन पीडितांना बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्यांची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पीडितांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना सतर्क करू नये, या उद्देशाने आरोपीने हा कट रचल्याचे समोर आले आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंदुशेखरने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांची हत्या करण्याचा पूर्वनियोजित कट रचला होता. यासाठी त्याने आपल्या अल्पवयीन मुलीची मदत घेतली. हत्येपूर्वी त्याने झोपेच्या सुमारे ५० गोळ्या, गोण्या, दोर आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी केले होते.
आरोपीने आधी आपल्या घरी पत्नीची हत्या केली. त्यानंतर मुलीच्या माध्यमातून पत्नीच्या इतर नातेवाईकांना फोन करून नॉनव्हेज जेवणाचे आमिष दाखवत घरी बोलावले. जेवण झाल्यानंतर आरोपीच्या अल्पवयीन मुलीने त्यांना झोपेच्या गोळ्या मिसळलेला मोसंबीचा रस दिला. त्यामुळे सर्वजण बेशुद्ध पडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बेशुद्ध झाल्यानंतर इंदुशेखरने त्यांना बाथरूममध्ये नेले. त्यानंतर पाटा-वरवंट्याचा वापर करून त्यांची हत्या केली. हत्येदरम्यान कपड्यांवर रक्ताचे डाग पडू नयेत, यासाठी त्याने ही पद्धत वापरल्याचे तपासात समोर आले आहे.
प्रत्येक हत्येनंतर आरोपीची अल्पवयीन मुलगी बाथरूमची स्वच्छता करत असे. त्यानंतर मृतदेह गोण्यांमध्ये भरून कर्नाटक आणि तामिळनाडूतील विविध ठिकाणी टाकून देण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
इंदुशेखरची पोलीस कोठडी बुधवारी संपणार असून, त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






