पुणे : कॅम्प परिसरातील जे. जे. गार्डनसमोरील पार्किंग लेनमध्ये विक्रीसाठी मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचे एकूण १०२ ग्रॅम ६० मिलीग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस हवालदार अतुल क्षीरसागर यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी परवेज जाफर शेख (वय ३५, रा. ई वॉर्ड, लोणावळा) आणि नबील नुरमोहम्मद शेख (वय ३४, रा. ए.बी.सी. फार्म, गल्ली क्रमांक ४, वानवडी) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या अंगझडतीत परवेज शेख याच्याकडे ४९ ग्रॅम ३५ मिलीग्रॅम, तर नबील शेख याच्याकडे ५३ ग्रॅम २५ मिलीग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. दोघांकडील अंमली पदार्थाचे एकूण वजन १०२ ग्रॅम ६० मिलीग्रॅम असून, त्याची किंमत ३ लाख ७ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या मेफेड्रॉनचा साठा बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भराड करीत आहेत.






