पुणे : सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील काही मजकुरावरून महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांच्याकडून एक मोठी अनवधानाने चूक घडली, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायना एन.सी. यांना विधान भवनात भेटीसाठी बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. या भेटीनंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी शायना एन.सी. यांची बाजू स्पष्ट केली. शिंदे यांच्या मते, बाळासाहेब ठाकरे हे सर्व शिवसैनिकांसाठी दैवत आहेत आणि त्यांचा अपमान कोणीही करू शकत नाही. त्यांनी पुढे सांगितले की, संबंधित छायाचित्रात बाळासाहेब मणिशंकर अय्यर यांच्या फोटोला चप्पल मारताना दिसत आहेत आणि केवळ अय्यर यांचाच चेहरा फाटला आहे, बाळासाहेबांचा कोणताही अवमान झालेला नाही.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावरही निशाणा साधला. काँग्रेसकडून जाणीवपूर्वक सावरकरांचा अपमान केला जात असून, अशा लोकांसोबत बसणारे आणि या अपमानावर एक शब्दही न बोलणारे उद्धव ठाकरे यांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दुसरीकडे, बाळासाहेबांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. या घटनेमुळे दोन्ही शिवसेना गटांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.

दरम्यान पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उद्धव ठाकरे यांना हे पुस्तक भेट देतानाचे छायाचित्र फाडण्यात आले. मात्र, या गडबडीत शायना एन.सी. यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांचेही एक छायाचित्र फाटले गेले. शेजारी उभे असलेल्या संजय निरुपम यांनी ही बाब तात्काळ त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शायना एन.सी. यांनी तो अर्धवट फाटलेला फोटो बाजूला ठेवला. या घटनेचे पडसाद मुंबई महानगरपालिकेतही उमटले.






