पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. पिंपळे गुरव भागातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएममध्ये चोरांनी डल्ला मारत तब्बल 20 लाख 30 हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे एटीएम केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 17 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. चोराने अत्यंत चलाखीने आधी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलर स्प्रे मारला, जेणेकरून कोणतीही हालचाल रेकॉर्ड होऊ नये. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातील संपूर्ण रोकड बाहेर काढली. अवघ्या काही मिनिटांतच हा सर्व प्रकार घडला आणि आरोपी लाखो रुपयांची रोकड घेऊन पसार झाला.
सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

चोरीची ही पद्धत पाहता सरावलेला गुन्हेगार किंवा टोळी यात असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. सांगवी पोलीस आता परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा कसून शोध घेत आहेत. शहरात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे






