बारामती, ता. 18 : बारामती परिसरात जातिवाचक शिवीगाळ, मारहाण आणि धमकावल्याच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. डोर्लेवाडी येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या वकील महिलेसह तिच्या बहिणीला मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. तर बारामती एमआयडीसीतील समर्थ इंटरप्रायजेस या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीत ऑक्सिजन गॅस हवेत सोडून तोडफोड केल्याचा तसेच जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

साहिल सावता नाळे, सावता नाळे, सुवर्णा सावता नाळे (सर्व, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) आणि अविनाश अर्जुन सावत (रा. काटेवाडी, ता. बारामती) व त्याचे दोन अनोळखी साथीदारांवर अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 – 3(1)(r),3(2)(va),३(१)(पाच),6 ; भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),118(1),3(5),351(2),351(3),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत डोर्लेवाडी येथे राहणाऱ्या हेमा कुंडलिक कांबळे (वय 30, व्यवसाय वकील) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 13 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास त्यांचा भाऊ घरी आल्यानंतर घराबाहेर हात धुण्यासाठी गेला होता. त्यावेळी शेजारी राहणारा साहिल नाळे मोबाईलवरून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता साहिल, सावता नाळे आणि सुवर्णा नाळे यांनी जातिवाचक शिवीगाळ करत घर खाली करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी साहिलने लाकडी काठीने हेमा यांच्या पायावर व पाठीवर मारहाण केली, तर सावता आणि सुवर्णा यांनी त्यांच्या बहिणीला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दुसऱ्या घटनेत, बारामती एमआयडीसीतील समर्थ इंटरप्रायजेस कंपनीचे कामकाज पाहणारे बापू जोतीबा सोनवणे (वय 48) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 3 ऑगस्ट 2025 रोजी कंपनीचे भागीदार अविनाश अर्जुन सावंत हे दोन अनोळखी व्यक्तींसह कंपनीत आले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून ऑक्सिजन गॅस टाकीचे पाइप काढले आणि गॅस हवेत सोडून दिला. तसेच ऑक्सिजन भरण्यासाठी आलेली रुग्णवाहिकाही परत पाठविल्याचा आरोप आहे.
यावेळी सोनवणे यांनी विरोध केला असता, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कंपनीतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि ऑक्सिजन टाक्यांचे साहित्यही वाहनातून नेल्याचा आरोप आहे. घटनेनंतर भीतीपोटी तक्रार दाखल केली नव्हती; मात्र कंपनीच्या भागीदार महिलेने धीर दिल्यानंतर आता तक्रार दिल्याचे सोनवणे यांनी नमूद केले आहे. या दोन्ही प्रकरणांमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित तक्रारींवर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे.







