शिरूर : रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी घोड उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि शेतकरी बांधवांनी आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत आमदार माऊली आबा कटके यांनी संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घोड उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी १५० क्युसेक वेगाने कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा शुभारंभ करण्यात आला. घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून रब्बी हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. वेळेवर पाणी उपलब्ध झाल्याने पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
यावेळी सुनील आबा धावडे, चिंचणीचे माजी सरपंच अनिल माणिक पवार, फतेसिंग वाबळे, पिंपळसुटीचे माजी सरपंच सुनील फलके, चिंचणीचे उपसरपंच अनिल पवार, नामदेव पवार, दीपक पवार, विजय पवार, माऊली पवार, शामराव पवार, भाऊसाहेब पवार, अभिषेक पवार, सागर पवार, साहेबराव पवार, घोड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता महेश शिंदे, शाखा अभियंता काळे, बापू शिवाजी पवार, दत्तात्रय पवार यांच्यासह परिसरातील पदाधिकारी, नागरिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेऊन संबंधित विभागाच्या माध्यमातून त्या मार्गी लावण्यासाठी आमदार माऊली आबा कटके यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.






