पुणे : सोशल मीडियावर पिस्टल विक्रीची पोस्ट टाकून इंस्टाग्रामच्या माध्यमातून शस्त्रविक्रीचा व्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिस्टल खरेदी करण्यासाठी गोव्यातून आलेल्या दोघा तरुणांसह चौघांना वाघोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्टल, चार मॅगझिन आणि १५ जिवंत काडतुसे असा एकूण ४ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

आकाश ऊर्फ गज्या अशोक मोरे (वय २१, रा. नवरत्न सोसायटी, वडगाव शेरी), मनीष दिलीप फर्नांडिस (वय २६, रा. चांदोर, मडगाव, गोवा) आणि चंद्रेश्वर माल्लेशी (वय २१, रा. चांदोर, मडगाव, गोवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाघोली पोलीस ठाण्याचे पथक केसनंद परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जोगेश्वरी डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ते चार जण थांबले असून त्यांच्याकडे पिस्टल आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत चौघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार देशी बनावटीची पिस्टल, चार मॅगझिन आणि १५ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून, त्याची एकूण किंमत ४ लाख १८ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश मोरे याच्याविरुद्ध यापूर्वीही पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याने इंस्टाग्रामवर पिस्टल विक्रीची पोस्ट टाकली होती. ही पोस्ट पाहिल्यानंतर गोव्यातील मनीष फर्नांडिस याने आकाशशी संपर्क साधला. त्यांच्यात पिस्टल खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला. त्यानुसार पिस्टल खरेदी करण्यासाठी हे तरुण केसनंद परिसरात आले होते. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.
आकाश मोरे याने ही पिस्टल मध्य प्रदेशातून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू, पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, अशोक शेळके, महादेव कुंभार, मारुती वाघमारे, विशाल गायकवाड आणि मंगेश शेळके यांच्या पथकाने केली.






