पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर या योजनेची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया नव्याने सुरू झाल्याचे मेसेज आणि काही संशयास्पद लिंक्स जोरदार व्हायरल होत आहेत. मात्र, प्रशासनाने हे मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले असून महिलांनी कोणत्याही अफवांवर किंवा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अनेक युजर्स लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसंदर्भातील संदेश फॉरवर्ड करत आहेत. या मेसेजसोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक महिला अशा भूलथापांना बळी पडण्याची शक्यता असते, कारण या लिंक्स फिशिंग किंवा सायबर फसवणुकीचा भाग असू शकतात.
नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय पाटील यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत कोणतीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे किंवा सूचना जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

सायबर गुन्हेगार शासकीय योजनांच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील चोरण्यासाठी अशा बनावट लिंक्सचा वापर करत असतात. त्यामुळे कोणत्याही सोशल मीडियावरील मेसेजवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवणे धोक्याचे ठरू शकते. शासनाकडून किंवा अधिकृत यंत्रणांकडून जेव्हा कधी कोणतीही नवीन घोषणा केली जाते, तेव्हा ती अधिकृत संकेतस्थळावर किंवा वर्तमानपत्रांत अधिकृतरीत्या प्रसिद्ध केली जाते.
या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आणि नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी अशा कोणत्याही खोट्या मेसेज किंवा लिंक्स पुढे पाठवू नयेत आणि स्वतःही त्यावर क्लिक करू नये. आपली फसवणूक टाळण्यासाठी नेहमी अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा.






