लोणी काळभोर, ता. 19 : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून पायी चाललेल्या दोन जणांचे मोबाईल फोन दोन वेगवेगळ्या घटनेत दुचाकीवरील चोरट्यांनी काही क्षणातच पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्र समोर शुक्रवारी (ता.16) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मागील सहा महिन्यांमध्ये अशा चोरीच्या घटना अनेक घडल्या आहेत. त्यामुळे वाटसरू व पहाटे जॉगिंगला जाणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची वेळ आली आहे.

अनिरुद्ध संतोष खताळ (वय २१, कदमवाक वस्ती, ता. हवेली जि. पुणे मुळ गाव मु. पो. हिरवे, ता. कोरेगाव जि. सातारा) व राजीव चंद्रकांत शहा (वय-47) यांचे 20 हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरी झाले आहेत. याप्रकरणी खताळ यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिरुद्ध खताळ हे फॅब्रिकेशन चे काम करतात. फिर्यादी आणि त्यांचा मित्र केस कापण्यासाठी शुक्रवारी गेले होते. केस कापून घरी पायी चालले होते. तेव्हा फिर्यादी हे त्यांच्या आईला फोनवर बोलत होते. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून जात असताना, ते दोघे जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राजवळ आले असता, पाठीमागून मोपेड स्कुटी वरुन आलेल्या दोघांनी 10 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हिसकावुन घेऊन गेले.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत शहा हे त्याच परिसरात पायी चालले होते. तेव्हा दोन अज्ञात चोरट्यांनी अचानक त्यांच्याजवळ येऊन जबरदस्तीने त्यांच्या हातातील मोबाईल चोरुन घेऊन गेले आहे. या दोन्हीघटना एकाच दिवशी व थोड्या वेळाच्या अंतराने घडल्या असून या दोन्ही घटनेतील दोन्ही चोरटे एकच आहेत. या दोन्ही घटनेत चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीचे मोबाईल लंपास केले आहेत.
याप्रकरणी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील नागलोत करीत आहेत.







