उरुळी कांचन, ता. 16 : उरुळी कांचन येथील तळवडी चौक परिसरातील सर्व्हिस रोडवर उभी केलेली 70 हजार रुपये किमतीची सुझुकी अॅक्सेस दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेहली. बुधवारी (ता. 11) रात्री सव्वाआठच्या सुमारास उरुळी कांचन येथील तळवडी चौकात ही घटना घडली. याप्रकरणी सोरतापवाडी येथील पार्थ संजय धर्माधिकारी (वय -22) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ धर्माधिकारी यांच्या मालकीची सुझुकी अॅक्सेस दुचाकी (क्रमांक एमएच 61 एच 4605) त्यांनी 20 ऑक्टोबर 2026 रोजी खरेदी केली होती. त्यांच्या कुटुंबाकडे आचारी म्हणून काम करणारे राजेश पोपळघट हे 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हेल्पर म्हणून आलेल्या एका तरुणाला आणण्यासाठी सोरतापवाडी फाटा येथे गेले होते. त्यानंतर टेबल घेण्याच्या कामासाठी राजेश, आचारी जयेश जाधव आणि हेल्पर असे तिघे उरुळी कांचन येथील तळवडी चौकात गेले.
रात्री सव्वाआठच्या सुमारास टेबल घेण्यासाठी राजेश आणि जयेश हे दोघे गेले, तर हेल्पर बाजूला निघून गेला. यावेळी राजेश यांच्याकडून दुचाकीची चावी गाडीला विसरून राहिली होती. टेबल घेऊन परत आल्यानंतर दुचाकी लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. त्यानंतर राजेश यांनी पार्थ धर्माधिकारी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.








