केडगाव, ता. 16 : शेतीसाठी सहा वर्षांपूर्वी उसने दिलेले पाच लाख रुपये परत मागितल्याच्या कारणावरून दोन मेव्हण्यांनी भावोजीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका मेव्हण्याने लोखंडी रॉडने डोक्यात वार करून त्यांना जखमी केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नी आणि मुलालाही मारहाण केल्याची घटना केडगाव येथील 22 फाटा परिसरात घडली.

याप्रकरणी प्रकाश विष्णू खटके (वय 45, रा. सणसर, ता. इंदापूर) यांनी यवत पोलिसांच्या केडगाव पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तात्या झुंबर मोरे आणि किरण झुंबर मोरे (दोघे रा. केडगाव, 22 फाटा, ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटके यांनी सुमारे सहा वर्षांपूर्वी शेतजमीन खरेदी करण्यासाठी दोन्ही मेव्हण्यांना पाच लाख रुपये उसने दिले होते. 14 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास ते पत्नी रूपाली आणि मुलगा अविष्कार यांच्यासह पैसे मागण्यासाठी मेव्हण्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी दोघांनी पैसे देण्यास नकार देत वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करीत खटके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी आणि मुलालाही मारहाण करण्यात आली. यावेळी किरण मोरे याने लोखंडी रॉडने खटके यांच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले. तसेच पुन्हा घरी आल्यास सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी यवत पोलीस तपास करीत आहेत.







