सासवड, ता. 16 : विहिरीतील पाण्याच्या वापरावरून झालेल्या वादातून चुलत नातेवाइकांनी एका कुटुंबाला शिवीगाळ व दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आस्करवाडी (ता. पुरंदर) येथे घडली. यावेळी पाइपलाइनसाठी अंथरलेले नऊ पाइप आणि विहिरीवरील मोटारीचा मीटर बॉक्स दगड मारून फोडण्यात आला. या घटनेत सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी ज्ञानेश्वर दत्तात्रय काळभोर (वय 40, रा. आस्करवाडी) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडू दशरथ काळभोर, विनायक दशरथ काळभोर, छाया खंडू काळभोर, राणी विनायक काळभोर, समीर खंडू काळभोर आणि प्रज्वल विनायक काळभोर (सर्व रा. आस्करवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर काळभोर हे आई-वडिलांसह गट क्रमांक 14 व 16 मधील शेतात विहिरीवरून पाइपलाइन टाकण्याचे काम करीत होते. त्यावेळी त्यांचे चुलते, चुलती आणि चुलत भाऊ तेथे आले. विहिरीतील पाणी आम्हालाही पाहिजे, त्यामुळे पाइपलाइन टाकायची नाही, असे म्हणत त्यांनी वाद घातल्याचा आरोप आहे.

यावेळी समीर काळभोर याने अंथरलेले नऊ पाइप आणि मोटारीचा मीटर बॉक्स दगड मारून फोडला. वडील दत्तात्रय काळभोर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही दगड फेकण्यात आला. तसेच सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सासवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.







