शिरूर : दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सतीश नाथराव मुंढे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तडजोडीनंतर ९५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर ते सापळा पथकाच्या हातावर तुरी देऊन पळून गेले होते. अखेर १६ नोव्हेंबर रोजी त्यांना शिरूर नगरपरिषद परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

सतीश मुंढे (वय ४५, पोलीस हवालदार, शिरूर पोलीस ठाणे) यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. तक्रारदाराविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांमध्ये अटक न करण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी मुंढे यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने ३० सप्टेंबर २०२६ रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी मुंढे यांनी तक्रारदाराला शिरूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या टाकळी हाजी पोलीस चौकी येथे बोलावले. पंचांसमक्ष सुरुवातीला एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन ९५ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान मुंढे यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. मात्र, सापळा पथकाची चाहूल लागताच त्यांनी स्वीकारलेली लाचेची रक्कम आणि तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ आणि भारतीय न्याय संहिता कलम २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी सतीश नाथराव मुंढे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.२५ वाजता शिरूर नगरपरिषद परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करून शिरूर येथील विशेष न्यायालयात, अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले.
न्यायालयाने मुंढे यांना २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईचे तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर काम पाहत असून, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.






