रत्नागिरी: रत्नागिरीतील खेड येथे एका भीषण कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मीरा रोडहून देवरूखकडे जात असताना कारचा ताबा सुटला आणि कार जगबुडी नदीच्या पात्रात १०० फूट खोल पाण्यात कोसळली. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला असून पाच जणांचा मृत्यू झाला. मिताली विवेक मोरे, मिहिर विवेक मोरे, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर आणि सौरभ परमेश पराडकर अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातात विवेक श्रीराम मोरे आणि श्रेयस राजेंद्र सावंत हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जात असतानाच वाटेतच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत कारचा चुरा झाला असून नदीत कोसळलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली आहे. पोलिस सध्या पुढील तपास करत आहे.







