छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या घटनेमागे राजकीय कारण असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हा प्रकार मद्याच्या नशेत झालेल्या वादातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा तीन तरुणांनी शिरसाट यांच्या घराच्या परिसरात दगड आणि काचेची बाटली फेकल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही तरुणांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त हे तिघे मित्र एकत्र आले होते. त्यांनी शहरातील एन-1 आणि उल्कानगरी परिसरात मद्यपान केले. रात्री उशिरा मद्याची दुकाने बंद झाल्यानंतर आणखी मद्य मिळवण्यासाठी ते गोलवाडी फाट्यावरील बारकडे गेले. याच भागात मंत्री शिरसाट यांचे निवासस्थान आहे.

बारमधून बाहेर पडल्यानंतर सर्व्हिस रोडवर त्यांची दुचाकी घसरली. त्यानंतर त्यांनी परिसरात काही वेळा चकरा मारल्या. संशयास्पद हालचाली दिसल्याने शिरसाट यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी वाद झाल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितल्याची माहिती आहे. मात्र, या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.

तिन्ही आरोपी उच्चशिक्षित
अटक करण्यात आलेल्या तरुणांमध्ये रोहित स्वप्निल भुताळे (24), शिवम ज्ञानेश्वर गायकवाड (24) आणि प्रतीक चांगदेव कुटे (25) यांचा समावेश आहे. रोहितने सायबर सिक्युरिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून तो जर्मनीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. शिवम एम.एस्सी.चे शिक्षण घेत आहे, तर प्रतीकने बी.फार्म.चे शिक्षण पूर्ण केले आहे.
मंत्र्यांच्या निवासस्थानावर झालेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र, हल्ल्यामागे नेमके कारण काय, हे पोलिसांच्या सविस्तर तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.






