छत्रपती संभाजीनगर: पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. केंब्रिज चौकाजवळील पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने पुलाचा कठडा तोडत थेट खाली कोसळली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खासगी ट्रॅव्हल्स पुण्यातून प्रवाशांना घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती. प्रवास सुरू असताना छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकाजवळ बस पुलावर आली. त्याचवेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की कठडा तुटून बस पुलाखाली कोसळली.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता. काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या अपघातामुळे पुणे-नागपूर प्रवासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बस चालकाचे नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून पुढील चौकशीत दुर्घटनेचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.






