उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर कोरेगाव मूळ (ता. हवेली) हद्दीत एसटी बस व रिक्षाचा अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षाचालकासह आणखी एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. इनामदारवस्ती परिसरात शुक्रवारी (ता. 08) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल देशमुख वाडा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकावर रस्ते नियमांकडे दुर्लक्ष करून अपघात केल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखन राजु राखपसरे (रा. घुलेवस्ती मांजरी रोड, हडपसर ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर लखन सिंधु पुरभे (रा. महादेव नगर, जय मल्हार कॉलनी, बाजार मैदान उरूळी कांचन ता. हवेली) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बस चालक ज्ञानोबा त्रिबंक मुरकुटे (वय 43, रा. मु.देवकरा पो. किनगाव ता. अहमदपुर, जि.लातुर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास लखन राखपसरे हा त्याच्या ताब्यातील रिक्षा घेऊन पुणे -सोलापूर महामार्गाने पुण्याकडे निघाला होता. यावेळी रस्ते नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवत होता. त्यावेळी रिक्षा लेन क्र.02 वरून अचानक लेन क्र. 01 वर घेतल्याने एसटी बसला जोरदार धडक बसून अपघात झाला.
या अपघातात रिक्षा चालक लखन राखपसरे हा त्याच्या सोबत असलेला इसम लखन पुरभे याच्या किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभूत होऊन दोन्ही वाहनांच्या नुकसानीस देखील कारणीभूत ठरला आहे. याप्रकरणी एसटी चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार रिक्षाचालक लखन राखपसरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.