संतोष पवार:

पळसदेव(पुणे): युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार मान्यताप्राप्त स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत पळसदेव ता इंदापूर येथील श्री पळसनाथ विद्यालयाच्या हरिश दिपक डोंबाळे या सायकलपटुने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले.
दिनांक २२ ते २४ जानेवारी २०२५ या कालावधीत पटना (बिहार) येथे ६८ व्या राष्ट्रीय शालेय रोड सायकलिंग स्पर्धा संपन्न झाल्या. बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण आयोजित राष्ट्रीय शालेय रोड मास स्टार्ट सायकलिंग स्पर्धेत श्री पळसनाथ विद्यालयाच्या हरीश डोंबाळे याने 19 वर्षे वयोगटात महाराष्ट्राचे नेतृत्व करत देशात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. सातत्यपूर्ण सराव आणि कठिण मेहनतीच्या जोरावर हरिशने गतवर्षी दोन वेळा आणि चालु शैक्षणिक वर्षात दोनवेळा राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत बहुमान मिळवला आहे.

हरीशच्या या यशामुळे गावाच्या नावलौकिकात भर पडल्याची प्रतिक्रिया न्हावी गावच्या सरपंच आशा डोंबाळे यांनी व्यक्त केली. पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात शिकत असलेल्या हरिशला प्रोत्साहन देत राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी त्याचे वडिल दिपक डोंबाळे यांनी प्रयत्न केले आहेत. यामुळे हरीशने प्रत्येक स्पर्धेत यश संपादन केले आहे.

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवणाऱ्या हरिशचे आणि मार्गदर्शक क्रीडा शिक्षक सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, सुवर्णा नायकवाडी, रामचंद्र वाघमोडे यांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगिराज काळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव यांनी अभिनंदन केले आहे .







