अकोला : पैशांचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेच्या नावाखाली एका तरुणाचा नरबळी दिल्याचा गंभीर आरोप अकोल्यातील कुटुंबीयांनी केला आहे. हेमंत प्रफुल्ल सपकाळ असे मृत तरुणाचे नाव असून, तो दोन मित्रांसोबत घरातून बाहेर पडल्यानंतर मध्य प्रदेशातील इंदूर येथे मृतावस्थेत आढळला. मांत्रिकाच्या सांगण्यावरून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा करण्यात आली आणि त्यात हेमंतचा बळी देण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी हेमंतच्या भावाने अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हेमंत १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान घरातून बाहेर पडला होता. अमरावतीला जात असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले होते. त्याच्यासोबत विवेक ऊर्फ विक्की शिंदे, अजय गायकवाड आणि आणखी एक व्यक्ती होती. हे तिघेही अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील रहिवासी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घरातून गेल्यानंतर हेमंतचे कुटुंबीयांशी मोबाईलवरून नियमित बोलणे सुरू होते. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्याचे कुटुंबीयांशी बोलणे झाले. त्यावेळी त्याने दुसऱ्या दिवशी घरी येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी त्याचा पुन्हा फोन आला. त्यावेळी आपला जीव धोक्यात असल्याचे सांगत त्याने कुटुंबीयांकडे मदतीची विनंती केली.

तक्रारीतील माहितीनुसार, हेमंतने आपण इंदूरमध्ये असल्याचे सांगितले. आपल्याला तिघांनी तिथे आणल्याचेही त्याने कुटुंबीयांना सांगितले. तसेच, ‘माझा जीव धोक्यात आहे. मला आज रात्री मारणार आहेत. मला वाचवा,’ अशी विनंती केली. आपण त्यांच्यापासून दूर असल्याचे आणि विवेक ऊर्फ विक्की आपल्याला फोन करून पुन्हा बोलावत असल्याचेही त्याने सांगितले. त्यावेळी कुटुंबीयांनी त्याला तिथे जाऊ नकोस, असे बजावले. मात्र, त्यानंतर हेमंतचा फोन बंद झाला.
हेमंतचा फोन बंद झाल्यानंतर कुटुंबीयांनी रात्री सुमारे बारा वाजता विवेक ऊर्फ विक्कीशी संपर्क साधला. त्यावेळी आपण रेल्वेमध्ये असून हेमंत मागील डब्यात असल्याचे त्याने सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.
१६ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता हेमंतचा मोबाईल पुन्हा सुरू झाला. कुटुंबीयांनी त्यावर फोन केला असता, समोरून पोलिसांनी उत्तर दिले. त्यांनी कुटुंबीयांना इंदूर येथील एम.जी. रोड पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले आणि हेमंतचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीय इंदूरला पोहोचले, असे भावाने तक्रारीत नमूद केले आहे.
विकी नावाच्या मांत्रिकाने दिलेल्या सल्ल्यानुसार पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा करण्यात आली आणि त्यात हेमंतचा बळी देण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित मांत्रिकाचे यापूर्वीचे अघोरी पूजेशी संबंधित काही व्हिडिओही समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे.
मात्र, हेमंतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यामागे अघोरी पूजा किंवा नरबळीचा प्रकार होता का आणि या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे, हे अद्याप तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची पडताळणी आणि पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येणार आहे.






