मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या D-Mart च्या गोदामावर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. गोदामाची तपासणी करताना FDA च्या अधिकाऱ्यांनी २० हजार ८५ लिटर खाद्यतेल जप्त केले आहे. या खाद्यतेलाची एकूण किंमत ५० लाख २७ हजार ८९३ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

खाद्यतेलाचा दर्जा निकृष्ट असण्याची तसेच उत्पादनांवर दिशाभूल करणारी लेबले लावण्यात आल्याची शंका अधिकाऱ्यांना आल्याने ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मात्र, या खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संबंधित उत्पादनांचा दर्जा निकृष्ट असल्याचे किंवा त्यामध्ये अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे अद्याप निश्चित झालेले नाही. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.








