विशाल शिंदे

भोर : भोर तालुक्यातील वेळू गावात इंडियन बलून फ्रॉग या वैशिष्ट्यपूर्ण बेडकाची नोंद झाली आहे. येथील भातशेतीत काम सुरू असताना एका शेतकऱ्याला हा वेगळ्या प्रकारचा बेडूक आढळून आला. त्यानंतर सुरक्षितपणे त्याचे रेस्क्यू करून वन्यजीव अभ्यासकांकडे ओळख पटवण्यासाठी देण्यात आले. वेळू परिसरात या प्रजातीची यापूर्वी प्रत्यक्ष नोंद नसल्याने ही घटना स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
वेळू येथील शेतकरी आणि सर्पमित्र शंकर वाडकर हे शेतात भात काढणीचे काम करत होते. त्यावेळी त्यांना जमिनीवर वेगळ्या प्रकारचा बेडूक दिसला. हा बेडूक इतर बेडकांपेक्षा वेगळा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. त्यानंतर पुणे जिल्हा वन्यप्राणी सर्परक्षक असोसिएशनचे सदस्य आणि वन्यजीव अभ्यासक गणेश माने यांच्याकडे त्याची ओळख पटवण्यासाठी देण्यात आला.

गणेश माने यांनी हा बेडूक इंडियन बलून फ्रॉग असल्याचे स्पष्ट केले. या बेडकाचे शास्त्रीय नाव ‘Uperodon globulosus’ असे आहे. धोका जाणवल्यास हा बेडूक शरीरात हवा भरून स्वतःला फुग्यासारखा गोलाकार करतो. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तो प्रामुख्याने जमिनीखाली बिळात राहतो. वाळवी आणि मुंग्या हा त्याचा प्रमुख आहार आहे. पावसाळ्यात प्रजननासाठी तो जमिनीबाहेर येतो.
वेळू परिसराचा या बेडकाच्या संभाव्य अधिवास क्षेत्रात समावेश असला, तरी यापूर्वी येथे त्याची प्रत्यक्ष नोंद झालेली नव्हती. त्यामुळे या बेडकाचे आढळणे स्थानिक जैवविविधतेच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
या घटनेनंतर शंकर वाडकर आणि वन्यजीव अभ्यासक गणेश माने यांनी नागरिकांना निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला. केवळ साप किंवा फुलपाखरांचे संरक्षण करणे म्हणजे निसर्गसंवर्धन नव्हे, तर झाडे, फुले, पक्षी आणि निसर्गातील प्रत्येक जीवाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
परिसरात अशा प्रकारचे वन्यजीव आढळल्यास त्यांना त्रास देऊ नये किंवा स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. वन्यजीवांचे संरक्षण करून निसर्गाचा समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.






