मुंबई; महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारात १६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वेतन करारामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. पगारवाढीबरोबरच कर्मचाऱ्यांना विविध सुविधाही मिळणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठीचा १२ वा वेतन करार १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. बँकेच्या मुख्यालयात हा करार पार पडला. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी या कराराला सहमती दर्शवली.
मागील वेतन करारात कर्मचाऱ्यांच्या पगारात १२ टक्के वाढ करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ करून १६ टक्के पगारवाढ मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याआधीच बँकेने कर्मचाऱ्यांना १४.२५ टक्के बोनस दिला होता. त्यामुळे पगारवाढ आणि बोनस अशा दोन्ही माध्यमांतून कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे.

नव्या वेतन करारातील महत्त्वाची तरतूद म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू करण्यात आलेली ‘कुटुंब सुरक्षा कवच’ योजना. सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या उर्वरित सेवाकाळातील प्रत्येक वर्षासाठी दोन महिन्यांचे वेतन संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला दिले जाणार आहे.
तसेच, मृत कर्मचाऱ्याच्या वारसाला बँकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी ३५ वर्षांपर्यंतची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, स्पर्धा परीक्षेत २० टक्के अतिरिक्त गुणांचे वेटेज देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
नव्या करारानुसार महानगर क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५,५०० रुपयांपर्यंत शहर भत्ता मिळणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कर्ज मर्यादांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
एकूणच, १६ टक्के पगारवाढ, बोनस, कुटुंब सुरक्षा कवच आणि इतर सुविधांमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हा नवा वेतन करार महत्त्वाचा ठरणार आहे.






