उरुळी कांचन, (पुणे): किरकोळ भांडणाच्या रागातून टोळक्याने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मोबाईल शॉपी व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणातील तीन आरोपींना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली आहे. रोहित कुंजीर, मनोज इंदलकर, तुषार कोलते अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. आर. शेट्टी यांच्या कोर्टाने आरोपींना अटी व शर्तींवर हा जामीन मंजूर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबर 2024 ला फिर्यादी अक्षय कुंजीर हे उरुळी कांचन येथील त्यांच्या मोरया मोबाईल शॉपवर काम करत असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहित कुंजीर, सुमित कुंजीर, भरत कुंजीर, मनोज इंदलकर, तुषार कोलते यांनी 15 दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणांवरून फिर्यादीच्या दुकानाची तोडफोड केली होती.
त्यानंतर आरोपी रोहित कुंजीर याने त्याच्यासोबत आणलेला कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, वार हुकल्यामुळे कोयता मोबाईल शॉपीच्या काचेवर लागून दुकानातील मोबाईल व दुकानाचे नुकसान झाले होते. त्यावेळी ओरडाओरड झाल्यामुळे आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले होते. त्यानंतर फिर्यादी यांच्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आरोपी रोहित कुंजीर व इतर लोकांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान उरुळी कांचन पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशाने आरोपींची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात असताना आरोपींनी अॅड. नितीन भालेराव यांच्या मार्फत पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नसून गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच आरोपींना अटक केले असून फिर्यादी आणि पोलिसांनी आरोपींना खोट्या गुन्ह्यात गोवले असल्याचा युक्तिवाद यावेळी आरोपींच्या वकिलांनी केला.
दरम्यान, आरोपींचे तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डीआर.शेट्टी यांच्या कोर्टाने तीन आरोपींना अटी व शर्तींवर जामीन मंजूर केल्याची माहिती आरोपींचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. या कामी अॅड. मयूर चौधरी, अॅड. स्वप्नील दाभाडे यांनी मदत केली.