पुणे : उजनी धरण हे सोलापूरसह पुणे,अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदायिनी आहे.लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न या धरणामुळे सुटला आहे. मात्र धरणातील पाणी आता लोकांच्या जीवावर उठलं आहे.या उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील उद्योग आणि महापालिकांचे जवळपास 20 पीएमसी विषारी पाणी मिसळत असल्याने धरणातील सर्व 117 टीएमसी पाणी विषारी बनत आहे.यामुळे लाखो नागरिकांना दुर्धर आजार झाल्याचा गंभीर आरोप जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी केला आहे

जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी उजनी धरण परिसरात पाहणी केल्यानंतर सरकारवर ताशेरे ओढत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. उजनी धरणाच्या या विषारी पाण्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या लाखो नागरिकांना याचा फटका बसत असून अनेकांना कॅन्सर आणि त्वचारोगासारखे दुर्धर आजार उद्भवू लागले आहेत. अशावेळी शासनाने याकडे गांभीर्याने पाहून सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी भिगवणमध्ये जाऊन केले आहे. उजनी धरण आता आयसीयुमध्ये भरती आहे, औद्योगिक भागातून जाणारे पाणी हेच त्याला कारण आहे. पाणी दूषित राहिल्याने उजनीतील जलचर मरत आहेत, उजनीतील पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना तीन पैशाला एक हजार लिटर पिण्यायोग्य पाणी मिळते. हे पाणी खराब करून उजनी धरणात येत असल्याने उजनी धरणाच्या खालच्या नागरिकांना मात्र 20 रुपयाला वीस लिटर पाणी विकत घ्यावे लागते. ही बाब त्यांनी निदर्शनास आणली. या पाण्याचा फटका नागरिकांना बसत असल्याने उजनी धरण प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान हा विकास नसून विनाश आहे प्रशासन मात्र यात कमी पडत असल्याचे मत रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनी व्यक्त केले. दिवसेंदिवस उजनी धरणाच्या पाणी प्रदूषणात वाढ होत असून नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.








