पुणे: पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या स्पर्धेसाठी पुणे महानगरपालिकेने 50 लाख रुपये दिल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना मॅरेथॉनसाठी एवढा खर्च करण्याची आवश्यकता काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यात ‘पुणे रन फॉर युनिटी’ या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत 40 हजारांहून अधिक पुणेकरांसह केनिया आणि आफ्रिकेतील इतर देशांमधील धावपटूंनी सहभाग घेतला.
अलका टॉकीज चौकातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रस्ता आणि पाषाण रस्ता अशा शहरातील प्रमुख मार्गांवरून धावपटूंनी सहभाग नोंदवला. राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य आणि नशामुक्त समाजाचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, या कार्यक्रमासाठी संस्कृती प्रतिष्ठानला महापालिकेकडून 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याच्या मुद्द्यावरून धंगेकर यांनी आक्षेप घेतला आहे. महापालिका आयुक्तांनी हा निधी मंजूर केला तरी कसा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असे म्हणत त्यांनी मोहोळ यांच्यावर निशाणा साधला.

सार्वजनिक पैशांचा वापर अशा कार्यक्रमांसाठी करण्याऐवजी दुष्काळग्रस्त भागांच्या मदतीसाठी करावा, अशी भूमिका धंगेकर यांनी मांडली आहे. त्यांच्या या टीकेनंतर मुरलीधर मोहोळ काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.






