पुणे: दिवाळीनिमित्त माहेरी गेलेल्या पुण्यातील 35 वर्षीय एअर होस्टेस वर्षा तुरकर यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर बोंडरानी गावाजवळ त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वर्षा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमागे लुटमारीचा उद्देश होता की आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

वर्षा या पुण्यात एअर होस्टेस म्हणून काम करत होत्या. त्यांचे माहेर मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किन्ही गावात आहे. 2024 मध्ये त्यांनी समर सैयद यांच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर त्या पुण्यात वास्तव्यास होत्या. त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या माहेरी आल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण घेत असताना वर्षा यांची गोंदियातील रितेश अग्रवाल याच्याशी ओळख झाली होती. 14 नोव्हेंबर रोजी रितेश किन्ही गावात आला होता. त्यानंतर सायंकाळी वर्षा त्याच्यासोबत बोंडरानी परिसरातील वैनगंगा नदीकाठी असलेल्या मंदिराजवळ फिरण्यासाठी गेल्या होत्या. तेथून दोघे जंगलाच्या दिशेने गेले होते.

दरम्यान, सायंकाळी सुमारे 6 वाजता वर्षा यांनी त्यांचे जीजू पप्पू पटेल यांना फोन केला. आपल्यासोबत लुटमारीचा प्रकार घडला असून हल्लेखोरांनी मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच पप्पू पटेल नातेवाईकांसह घटनास्थळी पोहोचले. रक्तबंबाळ अवस्थेतील वर्षा यांना तातडीने बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक माहितीनुसार, मास्क घातलेल्या अज्ञात व्यक्तींनी लुटमारीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय आहे. मात्र, पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. महाराष्ट्रातील दौनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने पोलिसांनी रितेश अग्रवाल आणि पप्पू पटेल यांची चौकशी करून जबाब नोंदवले आहेत. सर्व शक्यता तपासून पुढील तपास सुरू आहे.






