पुणे : व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून एका महिलेकडून टप्प्याटप्प्याने ५० लाख रुपये घेतल्यानंतर ही रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राविरुद्ध मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत केशरचंद बाठिया आणि रुपेश चंद्रकांत बाठिया (दोघे रा. वर्धमानपुरा सोसायटी, गंगाधाम रस्ता, मार्केट यार्ड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आरोपींशी ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी व्यवसायासाठी आर्थिक अडचण असल्याचे सांगितले. त्यानंतर वेळोवेळी महिलेकडून एकूण ५० लाख रुपये घेतले.

महिलेने दिलेली रक्कम परत करण्याची मागणी वारंवार केली. मात्र, आरोपींनी पैसे परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करत आहेत.







