डॉ. अशोक बालगुडे

पुणे : नोव्हेंबरचा मध्य सरताच राज्यात थंडीने आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. रात्रीचा पारा घसरू लागल्याने पहाटे गारठा जाणवू लागला आहे. धुळे येथे राज्यातील नीचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, आगामी काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सकाळची हुडहुडी वाढणार असली, तरी दुपारचे ऊन नागरिकांची काहिली कायम ठेवणार आहे.
राज्यात सध्या कमाल तापमानाचा पारा ३३ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा चटका, असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे. मात्र, रात्रीच्या तापमानात होत असलेली घसरण हिवाळ्याच्या आगमनाची चाहूल देत आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे. धुळे येथे १०.४ अंश, परभणी कृषी केंद्रात १०.५ अंश, निफाडमध्ये ११.५ अंश, तर जेऊर येथे १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातही गारठा वाढत असून, गोंदिया येथे १२.६ अंश, तर यवतमाळमध्ये १२.४ अंश तापमान नोंदविण्यात आले.

कोकणात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दिवसा उष्ण व दमट वातावरण, तर रात्री आणि पहाटे गारवा अशी स्थिती राहील. पश्चिम महाराष्ट्रातही दिवसा उन्हाचा प्रभाव कायम राहणार असून, रात्रीच्या तापमानातील घसरणीमुळे पहाटे थंडी जाणवेल.
मराठवाड्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून, दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री गारठा असे वातावरण असेल. विदर्भातील दहा जिल्ह्यांत कमाल तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज असला, तरी किमान तापमानातील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.
एकीकडे दुपारचे ऊन आणि दुसरीकडे पहाटेची थंडी, अशा दुहेरी हवामानाचा अनुभव सध्या राज्याला येत आहे. मात्र, किमान तापमानाचा पारा आणखी घसरल्यास आगामी दिवसांत हिवाळ्याचा कडाका अधिक जाणवणार आहे.






