पुणे: महाराष्ट्रातील सहकार चळवळीला औद्योगिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तळेगाव येथील बंद पडलेला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी 1,500 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. याशिवाय टॅक्सीचालकांना स्वतःच्या व्यवसायात मालकी हक्क मिळवून देण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या उपक्रमांची माहिती दिली.

तळेगाव येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन, पुण्यातील केंद्रीय सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाचे उद्घाटन आणि भारत टॅक्सी सेवेच्या प्रारंभप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
डिसेंबर 2027 पासून उत्पादन सुरू होणार

तळेगावमधील बंद पडलेल्या सहकारी संस्थेला पुन्हा उभे करण्यासाठी आयडीएमसी आणि इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून 1,500 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2027 पासून उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे. येथे सहकारी साखर कारखाने, इथेनॉल प्रकल्प आणि दूध डेअरीसाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार केली जाणार आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे अमित शाह यांनी सांगितले.

पुण्यातील कार्यालयामुळे सहकारी संस्थांना दिलासा
पुण्यात सुरू झालेले पश्चिम विभागीय कार्यालय बहुराज्य सहकारी संस्थांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. नोंदणी, प्रशासकीय कामे आणि विविध परवानग्यांसाठी संस्थांना आवश्यक सेवा स्थानिक पातळीवर मिळू शकतील. त्यामुळे कामकाज अधिक पारदर्शक आणि सोपे होण्यास मदत होईल.
भारत टॅक्सीमुळे चालकांना मालकी हक्क
भारत टॅक्सी ही सहकारी तत्त्वावर चालणारी सेवा असून, यात चालकांना कमिशन न देता काम करण्याची संधी मिळणार आहे. चालकांनाच या सेवेचे सदस्य आणि भागीदार बनवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होण्याबरोबरच प्रवाशांना वाजवी दरात प्रवास करता येईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.






