मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर विलीनीकरणाचा विषय सध्या बाजूला पडल्याचे चित्र आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आता वेगळ्या राजकीय पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दोन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांच्या बाजूने मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विलीनीकरण करण्याऐवजी शरद पवार यांचा पक्ष स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून सत्तेत सहभागी होऊ शकतो का, यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या दाव्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुती किंवा केंद्रातील एनडीएमध्ये स्वतंत्र घटकपक्ष म्हणून सहभागी होण्याचा पर्याय तपासत आहे. हा मार्ग स्वीकारल्यास पक्षाला केंद्र सरकारमध्ये महत्त्वाचे खाते मिळण्याची, तसेच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातही प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाला सध्या अनुकूलता नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शरद पवार यांच्या पक्षाने स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास त्याला आक्षेप नसल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडून मांडण्यात आल्याचे वृत्त आहे.

या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. विलीनीकरणाचा मार्ग बंद झाल्यानंतर शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.






