मुंबई: 500 कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न विचारले आहेत. या क्लिपमधील संभाषण खरे असल्याचा दावा करत शिंदे यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित आणखी माहिती आपल्याकडे असल्याचे सांगत ती योग्य वेळी उघड करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

‘तुम्ही काही चुकीचे केले नसेल, तर घाबरण्याचे कारण काय? ज्याला कर नाही त्याला डर कशाला?’ अशा शब्दांत जरांगे यांनी शिंदेंना सवाल केला. काही कट रचला जात असेल, तर त्याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. संबंधित ऑडिओ क्लिप कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेली नसून ती खरी असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या दाव्याची अद्याप स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या कार्यपद्धतीवरही जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. गुन्हा दाखल होण्याआधीच चौकशी सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच संबंधित व्यक्तीचा भाजपशी संबंध असल्यामुळे कारवाई टाळली जात असल्याचा दावाही केला. गरीब व्यक्ती असती तर आतापर्यंत तिला अटक झाली असती, असे वक्तव्य त्यांनी केले.

याशिवाय, या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम मोठ्या नेत्यांपासून गावपातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत होऊ शकतात, असा इशाराही जरांगे यांनी दिला. ‘माझ्याकडे बॉम्ब आणि अणुबॉम्बसारखी माहिती आहे. वेळ आली की ती बाहेर काढणार,’ असे सूचक विधान त्यांनी केले.

दरम्यान, या ऑडिओ क्लिपची सत्यता, त्यातील व्यक्तींची ओळख आणि तपासाबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आणि पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






