शिरूर,ता.12: शिरूर येथील पुणे-अहिल्यानगर बाह्य मार्गावर कोळपे हॉस्पिटल जवळ पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून, अपघातानंतर अपघातग्रस्त अज्ञात वाहन चालक वाहनासह पळून गेला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात पहिला दिले दमाई (वय 50,रा. बाबुरावनगर-शिरूर, ता.शिरूर, जि.पुणे.मूळ रा.कमलबजारनगर जि.अच्छाम नेपाळ) यांचा मृत्यू झाला आहे. या बाबत रुपेश टेकबहादुर दमाई (वय 24,रा.बाबुरावनगर,ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी रात्री (ता.11) साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिरूर परिसरातील बाबुरावनगर येथील कोळपे हॉस्पिटल जवळ पुणे-अहिल्यानगर मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर जवळ अहिल्यानगर बाजूकडे जाणाऱ्या लेनवर फिर्यादीचे चुलते पहिला दिले दमाई हे पादचारी मार्गाने पायी रस्ता ओलांडत होते. तेंव्हा अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये पहिला दमाई यांच्या डोक्याला दोन्ही हाताला पायाला व इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाचा मार लागला असून, त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा वाहन चालक वाहनासह पळून गेला आहे.
त्यामुळे अज्ञात वाहन चालक व वाहनाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.