पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींची एक ऑडिओ क्लिप हाती लागली असून त्यातून महत्त्वाचा पुरावा देखील हाती आला असल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला. दरम्यान, प्रीतसिंग हा अत्यंत महत्त्वाचा आरोपी असून, आम्ही त्या आरोपीचा शोध घेत आहोत. त्यासाठी आरोपी सहकार्य करीत नाहीत. आरोपींना प्रीतसिंगचा ठावठिकाणा माहिती आहे. मध्य प्रदेशात एक पथक त्यांचा कसून शोध घेत आहे. बेकायदा शस्त्र पुरवठा करण्यात त्याचा हात असल्याची पोलिसांची माहिती असल्याचेही तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.
शरद मोहोळ खून प्रकरणातील एक ते सहा आणि नऊ ते बारा क्रमांकाच्या आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी सतरा जानेवारीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. शरद मोहोळच्या खुनाच्या गुन्ह्यात चार शस्त्रांचा वापर झाला असून, त्यातील तीन शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. आता चौथे शस्त्र हस्तगत करायचे आहे. या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासात ऑडिओ क्लिप मिळाली असून, त्यातून महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. तसेच, विठ्ठल शेलार आणि फरार आरोपी गणेश मारणे यांनी शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी मीटिंग घेतली होती. या मीटिंगला कोण कोण हजर होते? त्याबाबत तपास करण्यासाठी आरोपी एक ते सहा यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सुनील तांबे आणि सरकारी वकील नीलिमा यादव इथापे यांनी केली.
त्यानंतर या अनुषंगाने तपास करण्यासाठी आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, मुळशी), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्रमंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती) यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली, तर धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुर यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.