लोणी काळभोर, ता. 19 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेलेल्या एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एच पी पेट्रोल पंपात आज सोमवारी (ता.19) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या आगीत चारचाकी गाडी जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर पेट्रोल पंपाला आग न लागल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इम्रान सय्यद (सातव नगर, हडपसर) हे व त्यांचा मित्र वैयक्तिक कामानिमित्त चारचाकी गाडीने बाहेरगावी चालले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना, त्यांनी त्यांची चारचाकी डिझेल भरण्यासाठी कदमवाकवस्ती येथील एच पी पेट्रोल पंपात घेतली. तेव्हा त्यांच्या गाडीच्या पुढे डिझेल भरण्यासाठी एक गाडी समोर होती. त्याच वेळी सय्यद यांच्या चारचाकी गाडीने इंजिनच्या बाजूकडून अचानक पेट घेतला. त्यावेळी चालक व पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून गाडी 20 ते 25 फूट पाठीमागे वळवली. तसेच पाण्याचा व फायर सिस्टिमचा वापर करून आग विझविली. यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी काही काळ ठप्पा झाली होती. तर आग बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, या आगीत गाडी जळून खाक झाली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुदैवाने गाडी मागे घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रसाद ताम्हाणे, मयूर बोरावके हे घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र हाकेच्या अंतरावर एचपीसीएलची अग्निबंबाची गाडी असताना देखील आग विझवण्यासाठी आली नाही. ही एक अतिशय दुर्दैवी बाब आहे







