लोणी काळभोर, ता. 19 : पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी धारधार शास्त्रासह अटक केली आहे. पोलिसांनी ही कारवाई लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात शनिवारी (ता.17) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास केली आहे.

चंद्रशेखर उर्फ चंद्रकांन्त उर्फ पिल्या दाजी चोरमले (वय 23, मुळ रा. मोहोळ,ता. मोहोळ, जि. सोलापुर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल राजाराम कर्डीले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्या चोरमले याने लोणी काळभोर परिसरात हाणामारी, भांडणे व सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केली आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीवर कायद्याचा बचक बसावा म्हणून पुणे पोलिसांनी पुणे शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विलास शिंदे व पोलीस अंमलदार राहुल कर्डीले हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी गस्त घालत होते. तेव्हा पोलिसांना २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला गुंड पिल्या चोरमले हा लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात असलेल्या अंबरनाथ सृष्टी प्लॉटींग असून त्याच्याजवळ धारधार कोयता आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता, पिल्या चोरमले आढळून आल्या.
दरम्यान, पिल्या चोरमले याने तडीपार आदेशाचा भंग केला आहे. त्याने पुणे शहर आयुक्तालयातील कोणत्याही सक्षम अधिकारी किंवा न्यायालयाची पूर्वपरवाणगी न घेता मिळून आला आहे. शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, दंडुके, बंदुका व शरीराविरुध्द इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानादेखील त्याच्याजवळ एक धारधार कोयता आढळून आला. लोणी काळभोर पोलिसांनी पिल्या चोरमले भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), म.पो.अधि. कलम १४२, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार विलास शिंदे, पोलीस अंमलदार राहुल कर्डीले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.







