न्हावरे: घोड धरण परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात शिरूर आणि श्रीगोंदा महसूल विभागाने सोमवारी (ता.16) आक्रमक पवित्रा घेतला. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि श्रीगोंद्याचे तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त धडक मोहीम राबवून अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे तब्बल आठ सेक्शन आणि नऊ फायबर बोटी जिलेटिनच्या साह्याने फोडून निष्क्रिय करण्यात आले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

घोड धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याने शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच पर्यावरण आणि नैसर्गिक संपत्तीवरही विपरीत परिणाम होत आहे. या गंभीर प्रकाराबाबत पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी सातत्याने आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर महसूल विभागाने प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या मोहिमेत शिरूर महसूल विभागाचे मंडल अधिकारी नंदकुमार खरात, ग्राम महसूल अधिकारी रूपेश शेटे, हर्षद साबळे, नितीन थोरात, श्रीकांत आढाव, कपिल बोडरे, महसूल सेवक जयकुमार कुसेकर आणि बाळासाहेब बुलाखे सहभागी झाले होते. तसेच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सागर बोऱ्हाडे आणि बालाजी मोटे यांनीही सहभाग घेतला.श्रीगोंदा महसूल विभागाकडून मंडल अधिकारी राजेंद्र ढगे, ग्राम महसूल अधिकारी विनोद जाधव, चेतन वाडेकर आणि समीर पठाण यांनी कारवाईत सहभाग नोंदविला.

कारवाईचे सातत्य राखण्याचे आव्हान!
आठ सेक्शन आणि नऊ फायबर बोटी उद्ध्वस्त करण्याची कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, केवळ एकदाच कारवाई करून चालणार नाही. अवैध वाळू उपशाचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. पुन्हा वाळू उपसा सुरू होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियमित गस्त आणि देखरेख ठेवावी. वाळू माफियांना अभय नव्हे, तर कायद्याचा धाक निर्माण करणारी कारवाईच आता अपेक्षित आहे.







