Pune Idol | पुणे : कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखली जाणारी ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ आयोजित ‘पुणे आयडॉल’ स्पर्धाची अंतिम फेरी रविवार (ता. १४) मे बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे पार पडली. चार विभागात घेतल्या गेलेल्या स्पर्धेत राज्यभरातील ८१६ कलाकार सहभागी झाले होते. यातील ५४ कलाकारांची निवड अंतिम फेरीसाठी झाली होती.
दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांनी ‘सोमेश्वर फाउंडेशन’ आयोजित सुरू केलेल्या या स्पर्धेचे हे वीसावे वर्ष होते.९ ते १४ मे अशी सहा दिवस ही स्पर्धा झाली. वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या स्पर्धेला गायक, कलाकार व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी झालेल्या अंतिम स्पर्धेत संगीत, सूर, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष पाहायला मिळाला.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी, जितेंद्र भुरूक, माजी नगरसेविका स्वाती निम्हण, बाळासाहेब बोडके, मुकारी अलगुडे, अमित गावडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गणेश घुले, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीन दांगट, जीएसटी अतिरिक्त आयुक्त सुनील काशीद -पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.
प्रास्ताविक आयोजक सनी निम्हण यांनी केले, तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी व प्रवीण पोतदार यांनी केले. स्वागत उमेश वाघ, अमित मुरकुटे यांनी केले व आभार बिपीन मोदी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनमाला कांबळे, किरण पाटील, रमेश भंडारी, तुषार भिसे अभिषेक परदेशी, कासिम तुर्क, नितेश दास, संजय माझिरे आदींनी परिश्रम घेतले.
यापुढे बोलताना आयोजक सनी निम्हण म्हणाले, “गायक, कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. या अनुषंगाने चालू केलेल्या स्पर्धेला नागरिकांचा आणि कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संयोजक आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही स्पर्धा पुढेही सातत्याने चालू राहील. सर्व समावेशक स्पर्धा असल्याने राज्यभरातील कलाकार यामध्ये सहभागी होऊ लागले आहेत.”
‘युवा आयडॉल’ प्रथम विजेती समृद्धी पटेकर म्हणाली, “पहिल्या दिवसापासून खूप चुरशीची स्पर्धा होती. अतिशय छान गाणाऱ्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम फेरी देखील खूप रंगली होती, स्पर्धेत भाग घेण्यासाठी मंच दिला याबद्दल आभारी आहे”.
अंतिम फेरीमध्ये ठरलेले विजेते पुढीलप्रमाणे :
‘लिटिल चॅम्प’ प्रथम श्रेया गाढवे, द्वितीय तनय नाझीरकर.
‘ओल्ड इज गोल्ड’ प्रथम अब्दुल रजाक बेगमपल्ली, द्वितीय शशिकला वाखारे.
‘जनरल कॅटेगरी’ प्रथम पल्लवी पाठक, द्वितीय डॉ. तेजस गोखले. ‘युवा आयडॉल’ प्रथम समृद्धी पटेकर, द्वितीय संदीप दुबे.
दरम्यान, ‘उत्तेजनार्थ’ श्लोक जावीर, प्राजक्ता माने असे ‘पुणे आयडॉल’ २०२३ चे विजेते ठरले आहेत.
विजेत्यांना रोख रक्कम पंधरा हजार, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ रोख रक्कम पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.