पिंपरी : बँकांमध्ये बनावट खाती उघडून त्याची माहिती चीन, नेपाळ येथील सायबर फसवणूक करणाऱ्यांना देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या टोळीचा पर्दाफाश करण्यास पिंपरी-चिंचवड सायबर सेल पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अविनाश ज्ञानोबा बाकलीकर ऊर्फ कॉम किंग (वय २६, रा. निलंगा जि. लातूर), आदाब रुपम शेख ऊर्फ मॅडी (वय २६, रा. नरेशविहार, खोडा कॉलनी, गाझियाबाद), सतीश भगवान मोरे (वय ३५, रा. पोरवाल रोड, लोहगांव, मूळ-तांबडवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवी येथील एका व्यक्तीला ट्रेडिंगद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास २५ ते ३० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६१ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यापैकी एक खाते हे वाघोली येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी चौकशी केल्यानंतर संबंधित बँक खाते बाकलीकर व मोरे यांच्या सांगण्यावरून काढल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून तीन आरोपींना लोणावळा येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे १२ मोबाइल संच, एक लॅपटॉप, नऊ बँक पासबुक, एटीएम, डेबिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड असा तीन लाख ५५०० रुपयांचा मुद्देमाल सापसुन आला.
बाकलीकर हा छत्रपती संभाजीनगर परिसरात वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत बँक खाते काढत होता. तसेच या खात्याची माहिती नेपाळ, चीनमधील सायबर गुन्हेगारांना देत असल्याचे उघड झाले. त्यांच्याशी संगनमत करून ते सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीसारखे काम करीत असल्याचे समोर आले. कंपनीने दिलेले टोपणनाव वापरून सायबर विश्वात व इतर आरोपींना आपली ओळख लपवून संपर्क करीत होते.
आंतरराष्ट्रीय सायबर आरोपी हे सायबर गुन्ह्यांची बैठक काठमांडू, नेपाळ येथे घेत असल्याचे सुद्धा तपासादरम्यान समोर आले. बाकलीकर याने एका खात्याच्या बदल्यात दोन ते तीन लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, सायबर गुन्हेगार यांच्याकडून पैसे स्वीकारण्यासाठी बायनान्सच्या माध्यमातून यूएसडीटी या क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे घेत असल्याचेही उघड झाले. बाकलीकर याच्या मोबाइलद्वारे ५५ खात्याची माहिती सापडली आहे.