नसरापूर : भोर-वेल्हा तालुक्यात सध्या माती तस्करी जोरात सुरू आहे. नर्सरीच्या नावाखाली मातीची तस्करी होत असल्याची चर्चा गावागावात रंगू लागली असून, शासनाची ‘माती’ तर तस्करांची ‘चांदी’ होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून दररोज कोट्यवधी रुपये किंमतीच्या हजारो ब्रास मातीचा अवैधरित्या उपसा आणि वाहतूक सुरू असताना, महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका का घेत आहे? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
भोर-वेल्हे तालुक्यातील मातीला जास्त मागणी आहे. नर्सरी व्यवसायाला येथील मातीची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने बहुतांश तालुक्यात येथून मातीची वाहतूक केली जाते. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त माती भरणे, भरधाव वेगाने चालवणे, कोणतेही झाकण न टाकणे, हे तर नेहमीच पाहायला मिळत आहे. भोर तालुक्यातील वाढणे, माझगाव, करंदी, मळे, भूतोंडे, कुरुंजी, निरा व देवघर या गावांमध्ये अवैधरित्या मातीचे उत्खनन केले जात असून, त्याची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तालुक्यातील जमिनीचा ऱ्हास होत आहे. महसूल विभागाचा माती वाहतुकीचा छोटा परवाना काढून मोठ्या प्रमाणात नर्सरीच्या नावाखाली मातीची तस्करी होत आहे. ही माती भोर तालुक्यातून हवेली तालुक्यात जात असल्याचेही बोलले जात आहे.
भोर तालुक्यात वीटभट्टयांची संख्या लक्षणीय आहे. या वीटभट्टी व्यावसायिकांना दरवर्षी हजारो ब्रास लाल (पोयटा) माती लागते. त्यासोबतच शेतीसाठी काळ्या कसदार मातीलाही मागणी असते. उन्हाळ्याच्या शेवटी नदी पात्रालगतची ‘मळई’, गावतलाव, तळे आदी ठिकाणचे पाणी कमी झाल्यानंतर तेथून दरवर्षी हजारो ब्रास मातीचा अवैधरित्या उपसा व वाहतूक केली जाते. केवळ कागदपत्रे रंगवण्यासाठी जुजबी स्वामित्वधन भरले जाते. प्रत्यक्षात मात्र कोट्यवधी रुपये किंमतीच्या हजारो ब्रास मातीची तस्करी केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्राम महसूली अधिकाऱ्यांना मिळतोय बक्कळ ‘खासगी महसूल’
कोट्यवधी रुपयांचा शासकीय महसूल बुडविण्यासाठी मदत करणाऱ्या ग्राम महसूली अधिकाऱ्यांना बक्कळ ‘खासगी महसूल’ प्राप्त होत असल्याच्या उघड चर्चा आहेत. महसूल विभागाचे कर्मचारी-अधिकारी आणि माती तस्करांचे एकमेकांशी ‘अर्थ’पूर्ण लागेबांधे असल्यानेच, या माती तस्करांना वर्षानुवर्षे महसूल विभागाचा ‘वरदहस्त’ लाभत आहे. परिणामी, हे माती तस्कर खुलेआम शासकीय गौणखनिजांची लूट करत आहेत.
शासनाचा कोट्यवधी रुपयांचा बुडवला जातो महसूल
शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवूनदेखील हे माती तस्कर मोठ्या दिमाखात अधिकाऱ्यांसमोर मिरवत असतात. या माती तस्करांच्या टोळ्यांचे ‘म्होरके’ राजकीय नेत्यांना व अधिकाऱ्यांना ‘प्यारे’ आहेत. या माती तस्करांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सध्या केली जात आहे.
परवाना एक पट तर वाहतूक तिप्पट
माती उत्खनन व वाहतुकीचा थोडाच परवाना काढून परवान्यापेक्षा जास्त वाहतूक होत असते. परवाना ५०० ब्रास असेल तर माती वाहतूक १५०० ब्रास होत असल्याचे बोलले जात आहे. एकाच नंबरच्या अनेक गाड्या २४ तास या अवैध कामासाठी राबताना दिसत आहेत.
…तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणार
भोर तालुक्यातील माती उपसाचे परवाने दिलेला कालावधी अद्याप संपलेला नाही. कालावधी संपल्यानंतर झालेला उत्खननाचे मोजमाप करून तलाठी अहवाल पाठवित असतो. अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर रॉयल्टी भरल्यापेक्षा जास्त उत्खनन केले असेल तर उत्खनन झालेल्या ज्यादा मातीची रॉयल्टी भरून घेतली जाते. मात्र, जर कोणी बेकायदेशीर मातीचे उत्खनन करून विक्री केली असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
– सचिन पाटील, तहसीलदार भोर, जि. पुणे.