पुणे : पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुळकायदा शाखेतील एक कॉम्प्युटरच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात चर्चांना उधान आले आहे. ५ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीत ही घटना घडली आहे.
याप्रकरणी महसूल सहाय्यक दिपक साहेबराव शिंदे (वय-४९) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं हा कॉम्प्युटर का चोरून नेला असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महसूल सहाय्यक म्हणून नोकरीस आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयात नेमणूकीस आहेत. त्यांच्या ताब्यात एक कॉम्प्युटर होता. त्यांनी तो कुळकायदा शाखेत पी. टी. बी संकलन या कार्यालयात ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून कुळकायदा शाखेत असलेल्या प्रो वन ४४० जी टेन या कंपनीचा कॉम्प्युटर चोरून नेला.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर आता वरिष्ठांच्या परवानगीने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानूसार पोलीस या कॉम्प्युटरचा शोध घेत आहेत. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.