पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. त्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली.यानंतर दोन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा केल्याचे समजते.
दरम्यान, महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथ आणि शिवसेनेतील बंडानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी ३० जून रोजी राज्यातील सत्तेची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर गटातील सत्तावाटपाच्या सूत्रावर त्यांनी चर्चा केली.
शाह यांनी शुक्रवारी रात्री ट्विट करून म्हटले- ‘मला खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही दोघेही प्रामाणिकपणे जनतेची सेवा कराल आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाल.’
सोमवार ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी
११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणार्या महत्त्वपूर्ण सुनावणीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि महाराष्ट्राच्या इतर मुद्द्यांवर प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी शिंदे आणि फडणवीस दिल्लीत पोहोचले असल्याचे बोलले जाते. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या गटाने एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं सीएम शिंदे यांनी म्हटलं आहे.