
पायलट बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता फक्त विज्ञान शाखेतील नव्हे, तर कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होण्याची संधी मिळणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने महत्त्वाचा प्रस्ताव तयार करून नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तो कायदा मंत्रालयाकडे जाईल आणि याबद्दलचे नियम अधिकृतपणे लागू होतील.

आत्तापर्यंत केवळ विज्ञान सशाखेचे विद्यार्थीच व्यावसायिक पायलट परवाना मिळवण्यासाठी पात्र होते. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी फक्त शाखेच्या अटीमुळे या क्षेत्रात प्रवेश करू शकत नव्हते. १९९० पासून ही अट लागू होती. पण आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ही अट रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे १२वी उत्तीर्ण, वैद्यकीयदृष्ट्या फिट असलेले आणि आवश्यक परीक्षा उत्तीर्ण करणारे कोणतेही विद्यार्थी पायलट प्रशिक्षणासाठी पात्र ठरतील.

या बदलामुळे पायलट बनण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा अंदाज आहे. त्यामुळे देशभरातील फ्लायिंग स्कूल्सना अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने फ्लायिंग स्कूल्सना त्यांच्या वेबसाइटवर प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय केवळ एक नियम बदल नाही, तर हे समावेशकतेकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. आता कोणतीही शाखा असो, आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न साकार करणं प्रत्येका विद्यार्थ्यांसाठी शक्य होणार आहे.







