पुणे : आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वारंवार स्त्रीबीज काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून तपास सुरू केला आहे. ठाणे, बारामती आणि नाशिक येथील रुग्णालये तसेच आयव्हीएफ केंद्रांसह एकूण 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 29 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून संशयितांच्या आर्थिक व्यवहारांचीही तपासणी सुरू आहे.

या प्रकरणाची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यापासून झाली. मंजूषा वानखेडे यांच्यासह अन्य 16 जणांविरोधात असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) नियमन कायदा आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच प्रकरणाच्या आधारे ईडीकडून आर्थिक व्यवहारांचा तपास केला जात आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना हेरून त्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले जात होते. त्यानंतर एजंटांच्या मदतीने या महिलांना आयव्हीएफ केंद्रे आणि स्त्रीबीज व शुक्राणू साठवणाऱ्या एआरटी बँकांमध्ये पाठवले जात असल्याचा संशय आहे. महिलांना ठराविक मोबदला दिला जात होता, तर उर्वरित रक्कम एजंट कमिशन म्हणून घेत असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येते.

काही महिलांना महाराष्ट्रासह इतर राज्यांतील केंद्रांमध्ये पाठवून वारंवार स्त्रीबीज संकलन केले जात असल्याचा आरोप आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकत होता.
महिलांची ओळख लपवण्यासाठी आणि त्या वैद्यकीय प्रक्रियेसाठी पात्र असल्याचे दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचाही संशय आहे. यात पॅन कार्ड, प्रतिज्ञापत्रे, जन्मतारखेचे दाखले, रक्तचाचणी अहवाल आणि विम्याशी संबंधित कागदपत्रांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
ईडीने छापेमारीदरम्यान रोकड जप्त केली असून संशयितांशी संबंधित बँक लॉकर आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक गोठवण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, एजंटांचे जाळे आणि संबंधित केंद्रांची भूमिका यांचा पुढील तपास सुरू आहे.






